अवयवदान पंधरवड्याला सुरुवात
schedule03 Aug 25 person by visibility 20 categoryकोल्हापूर

राज्यात विविध जनजागृती उपक्रमांनी आजपासून ‘अवयवदान पंधरवड्या'ला सुरुवात
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली अवयवादानाची शपथ
मुंबई, ३ ऑगस्ट २०२५ – महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांनी‘ अवयवदान पंधरवडा साजरा होत असून, स्वत पुढाकार घेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज अर्ज भरून अवयवादानाची शपथ घेतली आणि या अभियानाचा शुभारंभ केला.
राज्यातील जनतेने या अभियानामध्ये सहभागी होऊन अवयवदानाची शपथ घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केले आहे.
अंगदान जीवनदान संजीवनी अभियानासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात अवयवदान पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत व्यापक जनजागृती व समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
या अभियानामध्ये शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, आरोग्य संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. अवयवदान क्षेत्रात देश आणि राज्य स्तरावर काम करणाऱ्या संस्था रोट्टो, सोट्टो, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्यां व झेडटीसीसी, मुंबई, पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने हे अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे.
अवयवदान ही एक सामाजिक बांधिलकी आहे. समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडवण्यासाठी प्रभावी जनजागृती अत्यावश्यक आहे. मोहिमेतून अवयवदानासंबंधी भीती, गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या पंधरवड्यात राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व आरोग्य संस्था स्तरावर, शाळा, महाविद्यालये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून मोहिमेला प्रेरणादायी रूप दिले जाणार आहे.
राज्यात अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून, महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेणे हे या उपक्रमामागील उद्दिष्ट आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या मोहिमेला जनतेच्या सक्रीय सहभागाने यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.