मॅच संपू दे मग बघतो, अंपायर धर्मसेनाने केएल राहुलला दिली धमकी, नेमकं घडलं काय?
schedule02 Aug 25 person by visibility 13 categorySports

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका ही केवळ खेळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मैदानावरील खेळाडूंमधील शाब्दिक चकमक आणि अंपायरिंगच्या वादामुळेही ती चांगलीच गाजतेय.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका ही केवळ खेळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मैदानावरील खेळाडूंमधील शाब्दिक चकमक आणि अंपायरिंगच्या वादामुळेही ती चांगलीच गाजतेय. शुभमन गिल, बेन स्टोक्स, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, बेन डकेट आणि क्रिस वोक्स हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेच, पण जे नेहमी शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात, असे के. एल. राहुल आणि जो रूटसुद्धा आपला संयम गमावताना दिसले.
ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अंपायर धर्मसेना भडकले....
या सगळ्यात कमाल म्हणजे दुसऱ्या दिवशी ओव्हल टेस्टमध्ये जेव्हा श्रीलंकेचे अनुभवी अंपायर कुमार धर्मसेना के. एल. राहुलवर चिडले आणि थेट त्याला इशाराच देऊन टाकला, "आपण सामना संपल्यानंतर पाहू. तू अशा प्रकारे बोलू शकत नाहीस."
नेमकं काय घडलं?
घटना अशी घडली की, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानावर किरकोळ वाद झाला. ही चकमक शांत व्हावी म्हणून अंपायर धर्मसेना पुढे आले. पण भारताचा खेळाडू के. एल. राहुल आपल्या सहकाऱ्याच्या समर्थनार्थ पुढे आला आणि अंपायरला थेट विचारलं, "तुम्हाला काय वाटतं, आम्ही काहीही प्रतिक्रिया न देता फक्त फलंदाजी-गोलंदाजी करून निघून जावं? यावर धर्मसेना भडकले आणि म्हणाले, "तू असं बोलू शकत नाहीस. आपण सामन्यानंतर बोलूया. हे असं चालणार नाही."
थोडक्यात त्यांच्यात काय संवाद झाला पाहू?
के. एल. राहुल : “आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्ही शांत राहावं का?”
धर्मसेना : “तुला वाटतं एखादा गोलंदाज तुझ्याजवळ येऊन काही बोलेल आणि तू शांत राहशील? असं चालत नाही राहुल.”
राहुल : “मग आम्ही काय फक्त खेळून निघून जावं?”
धर्मसेना : “सामन्यानंतर बोलू. तू अशा भाषेत बोलू नकोस.”
या प्रकारानंतर सामन्याचा तणाव वाढला होता. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, मैदानावरील प्रत्येक क्षण हा खेळाडूंमध्ये भावना, दबाव आणि संयमाची कसोटी पाहणारा असतो.
भारताची इंग्लंडवर 52 धावांची आघाडी
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वालच्या नाबाद 51 धावांमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध खेळ थांबवेपर्यंत 2 विकेट गमावून 75 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 52 धावांची आघाडी आहे. भारताने सलामीवीर केएल राहुल (7) आणि साई सुदर्शन (11) यांचे विकेट गमावले, परंतु जैस्वाल आणि नाईट वॉचमन आकाश दीप (नाबाद 4) यांनी भारताला आणखी धक्का बसू दिला नाही.
तत्पूर्वी, पहिल्या कसोटीत भारताच्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 247 धावा करून थोडीशी आघाडी घेतली होती. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट घेत भारताकडून शानदार पुनरागमन केले आणि पाहुण्या संघाने इंग्लंडची आघाडी 23 धावांपर्यंत मर्यादित केली.