ऊस तोडणी मजुरांना अपघाती विम्याचे धनादेश
schedule03 Aug 25 person by visibility 18 categoryकोल्हापूर

चिखली (ता. शिराळा) : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या गळीत हंगामात अपघाताने जखमी झालेल्या ऊस तोडणी मजुरांना अपघाती विम्याचे धनादेश आज प्रदान करण्यात आले. संचालक विराज नाईक यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप झाले. कार्यकारी संचालक अमोल पाटील प्रमुख उपस्थित होते. तोडणी कामगार सुनील वसंत पाटील (बिऊर) हे ट्रॉलीत ऊस भरताना पडल्याने जखमी झाले होते तर, वंदना सुरेश काजुगडे (अस्वलआंबे, ता. परळी, जि. बीड) यांना ऊस तोडताना सर्पदंश झाला होता. त्यांना कारखान्याने उतरलेल्या मजुरांच्या विमा योजनेचा फायदा झाला. आज त्यांना प्रत्येकी अठरा हजार सातशे पन्नास रुपयांचे धनादेश देण्यात आले. यावेळी सचिव सचिन पाटील, शेती अधिकारी ए. ए. पाटील, मुख्य लेखापाल दत्ताजीराव देसाई, उप ऊस विकास अधिकारी संदीप पाटील, प्रतीक पाटील, सुरज पाटील, मयूर सपकाळ, राहूल पाटील आदी उपस्थित होते.