26 जानेवारीपर्यंत 50 हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण करा
schedule03 Aug 25 person by visibility 13 categoryBusiness

सूक्ष्म नियोजनातून 26 जानेवारीपर्यंत 50 हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण करा
- सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
* घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत दिरंगाई नको
* सावकारी रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करुन जगासमोर आदर्श निर्माण करा
* उमेद अभियानातून बचतगटांना अधिक सक्षम करा
कोल्हापूर : मातोश्री पाणंद रस्ते, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, सिंचन विहिरी, गोठे आणि घरकुलांचे बांधकाम या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. सूक्ष्म नियोजन व त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी करुन 26 जानेवारी 2026 पर्यंत जिल्ह्यात 50 हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा, असे निर्देश देवून या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांची आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम तसेच गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यासाठी महसूल विभागाने पासेस वितरीत करावेत. घरकुल बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये यासाठी गवंड्यांचे प्रशिक्षण घ्या. परंतु कोणत्याही कारणाने घरकुलांचे बांधकाम अडणार नाही, तसेच या कामी दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्या. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार चोख अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्यांची गय करु नका. चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक तर चुकीचे काम करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करा. शासकीय योजनांची अंमलबजावणी लोकाभिमुख होऊन पारदर्शी पध्दतीने करा. योजनांच्या अंमलबजावणीत गट विकास अधिकारी व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची महत्वाची जबाबदारी असून क्षेत्रीय भेटींवर भर द्या, असे सांगून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत चांगले काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची परराज्यात अभ्यास दौऱ्यासाठी निवड करा, अशा सूचना पालकमंत्री श्री.आबिटकर यांनी दिल्या.
उमेद मॉलच्या माध्यमातून बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्या
उमेद मॉलच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांची चांगली विक्री होण्यासाठी योग्य नियोजन करा. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातून बचतगटांना अधिक सक्षम करा. उमेद अभियानाच्या निधीचा वापर नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी व्हावा, यासाठी प्रयत्न करा. या अभियानातून राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या यशकथांची व्यापक प्रसिद्धी करुन इतरांना प्रेरित करा, असेही त्यांनी सांगितले.
सावकारी रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करुन जगासमोर आदर्श निर्माण करा
एकदा ठरवलं की कोणताही उपक्रम यशस्वी होतोच, हे कोल्हापूर जिल्ह्याने आजवर दाखवून दिले आहे. कोल्हापूर हा समृध्द जिल्हा असून जिल्ह्यातील एकाही महिलेला आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी कंपनीकडून कर्ज घ्यायला लागू नये, यासाठी शासकीय यंत्रणा व बँकांनी प्रयत्न करावेत. बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सावकारी रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करा आणि जगासमोर आदर्श निर्माण करा, असे सांगून बचतगटांना बँकांनी कर्जपुरवठा करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.
पाणंद रस्ते, शेततळी, गोठे, विहिरी, घरकुल बांधकाम, नरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे, उमेद अभियानांतर्गत बचत गटांचा विकास आदी विविध विषयांचा सविस्तर आढावा पालकमंत्री श्री आबिटकर यांनी बैठकीत घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात 26 जानेवारी 2026 पर्यंत 50 हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यातील 25 हजार घरकुलांना सूर्यघर योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर पासून दर महिन्यात 12 हजार 250 असे सप्टेंबर ते डिसेंबर अखेर 50 हजार घरकुले बांधण्याचे नियोजन केले आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सूर्यघर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी 45 हजार 242 नागरिकांना पहिल्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. तर 15 हजार 874 नागरिकांना दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. आधार अपडेट नसणे, जागा नावावर नसणे, तांत्रिक अडचणी, बांधकाम कामगार वेळेत न मिळणे, निधीची मर्यादा, लाभार्थ्यांकडून घराचे बांधकाम वेळेत सुरु न होणे व पावसाळा आदी कारणांमुळे लाभार्थ्यांकडून घरकुलांचे बांधकाम वेळेत सुरु होण्यात अडचणी येत असल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले.
गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी केलेल्या नियोजनाची व झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
