औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधून जगापुढे आदर्श निर्माण करुया - जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule01 Aug 25 person by visibility 27 categoryBusinessTechnology

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा 63 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
• देशाच्या विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा महत्त्वपूर्ण वाटा
* औद्योगिक क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी एमआयडीसीने प्रयत्न करावेत; यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य
कोल्हापूर दि.1 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कागल पंचतारांकित वसाहतीसह अन्य औद्योगिक वसाहत क्षेत्रांमध्ये झालेला पायाभूत व औद्योगिक विकास महत्वपूर्ण आहे. औद्योगिक क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी एमआयडीसीने प्रयत्न करावेत, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन करुन जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधून जगापुढे आदर्श निर्माण करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा 63 वा वर्धापन दिन सोहळा पॅव्हेलियन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, सहायक क्षेत्र व्यवस्थापक शैलेंद्र कुरणे आदी उपस्थित होते. यावेळी 25 वर्ष उत्तम सेवा बजावलेले महामंडळाचे उपअभियंता अजयकुमार रानगे तसेच नाईक बाळासाहेब चौगुले यांचा व गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, देशातील महत्त्वपूर्ण महामंडळांपैकी एक असणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीही औद्योगिक विकासाला चालना दिली होती. जिल्ह्यात एमआयडीसी अंतर्गत नवनवीन उद्योगांची झपाट्याने वाढ होत असून यामुळे रोजगार निर्मिती होत आहे. तसेच क्लस्टरच्या माध्यमातून विकास घडत आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासात औद्योगिक क्षेत्राचा वाटा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, एमआयडीसीच्या माध्यमातून कॉमन ट्रीटमेंट प्लांटची उभारणी करण्यात येणार असून यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखले जाईल. एमआयडीसीच्या माध्यमातून कोल्हापूरचा औद्योगिक ब्रँड तयार होत असून ही ओळख अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी तर सूत्रसंचालन शैलेंद्र कुरणे यांनी केले. आभार उप अभियंता अजयकुमार रानगे यांनी मानले.

