महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या 35 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान
schedule01 Aug 25 person by visibility 29 categoryकोल्हापूरBusinessTechnology

प्रशासकीय सेवांना अधिक सुलभ आणि प्रभावी करूया - जिल्हाधिकारी अमोल येडगे
प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक - सीईओ एस.कार्तिकेयन
• महसूल सप्ताहाचा शुभारंभ, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे जिल्हाभर आयोजन
• महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या 35 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान
कोल्हापूर, दि.1 : नागरिकांना सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महसूल दिन आणि महसूल सप्ताह दरवर्षी आयोजित केला जातो. या दरम्यान विविध उपाय आणि उपक्रम राबवून प्रशासकीय सेवांना अधिक सुलभ आणि प्रभावी करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. महसूल दिनानिमित्ताने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा केला जातो, ज्यामध्ये विविध कार्यक्रम, शिबिरे, आणि महसूल अदालतींचे आयोजन केले जाणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात झाला.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, झिरो पेंडन्सी राबवून नागरिकांना महसूल विभागाच्या कार्याची याकाळात माहिती द्या, जसे की जमीन नोंदी, मालमत्ता कर, आणि इतर प्रशासकीय सेवा. महसूल विभागाच्या सेवांचा दर्जा सुधारणे आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करणे हाही सप्ताह आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करुन विशेष मोहिमांद्वारे, नागरिकांना त्यांच्या जमीन आणि मालमत्तेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रोत्साहन द्या. याचबरोबर विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन, सन्मान करुन आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करून प्रशिक्षणातून त्यांच्या कार्यक्षमता वाढवा. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले की, महसूल विभाग हा प्रशासनातील मातृ विभाग आहे. त्यांनी प्रोबेशनरी काळात महसूल विभागात काम करताना आलेले अनुभव यावेळी सांगितले. या विभागात प्रत्येक प्रकरणातून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळत असते. आजच्या काळात दैनंदिन कामात तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे सांगून ते आत्मसात करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. त्यांनी एआय आणि ब्लॉकचेन सारखे तंत्रज्ञान शिकण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले, डिजीटल आणि सुलभ प्रक्रियांमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचतो. प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होऊन प्रशासन अधिक गतिमान होते.
यावेळी कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, मुद्रांक सह जिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख शिवाजी भोसले यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सेवा कालावधीतील अनुभव सांगत उत्कृष्ट महसूल कामकाज करण्याबाबत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार अनिलकुमार हेळकर, अपर चिटणीस स्वप्निल पवार यांच्यासह वर्ग एक ते चार मधील 35 महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यातील काही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संपत खिलारी यांनी केले तर आभार तहसीलदार हनमंतराव म्हेत्रे यांनी मानले.
सप्ताहात या विशेष उपक्रमाचे होणार आयोजन -
शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना या अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप, पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे किंवा सरकारजमा करणे याबाबत निर्णय घेणे, एम सँड / कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे इत्यादी.

