नातवाने केला आजोबाचा खून
schedule01 Aug 25 person by visibility 11 categoryPolice Diary

रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात 75 वर्षीय वृद्धाचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा (Mhasala) शहरात काल (31 जुलै) संध्याकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. घरात एकटे असलेल्या 75 वर्षीय वृद्धाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. प्रथमदर्शनी हा प्रकार अनोळखी व्यक्तीने केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपास जसजसा पुढे गेला, तसतशी खऱ्या आरोपीची ओळख पटली. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, मृत व्यक्तीचाच नातू निघाला आहे.
बनावट कहाणी करून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न
खून झालेल्या वृद्धाचे नाव शौकत हुसैन परदेशी (75) असून, ते म्हसळा शहरात आपल्या घरी एकटे असतानाच त्यांचा निर्घुण खून करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृत व्यक्तीचा नातू मोहमद अली असगर परदेशी (20) याने पोलिसांना सुरुवातीला सांगितले की, एक अनोळखी व्यक्ती तोंडाला कपडा बांधून घरात घुसला आणि धारदार शस्त्राने आजोबांच्या गळ्यावर, डोक्यावर आणि हातावर वार करून पळून गेला. नातवाच्या जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला.
पोलिसांना चकवा देणाऱ्या नातवाचा अखेर पर्दाफाश
मात्र म्हसळा पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने सखोल चौकशीसाठी मोहमद अली परदेशीला यात घेतले आणि अखेर त्याने कबुली दिली की, आपण घरी थ्रिलर पिक्चर पाहून आपल्या आजोबाच खून केला आहे. नातवाच्या कबुलीनंतर म्हसळा पोलिसांना अवघ्या काही तासांतच या खुनाचा छडा लावण्यात यश आले आहे. या प्रकरणातील खून करण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.