आधी डोके भिंतीवर आपटले आणि नंतर दोरीने गळा आवळला
schedule17 Dec 24 person by visibility 207 categoryPolice Diary

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील तारळे गावात पतीने पत्नीचा डोके भिंतीवर आपटून आणि दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगल पांडुरंग चरापले (वय ४३) असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणात तिचा पती पांडुरंग ज्ञानू चरापले (वय ५०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग आपल्या पत्नी मंगलवर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात पांडुरंगने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले आणि नंतर दोरीने तिचा गळा आवळून खून केला.
पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर पांडुरंगने तिला जिन्यावरून पडून जखमी झाल्याचे सांगत उपचारासाठी राशिवडे येथे नेले. मात्र, उपचारादरम्यान संशयास्पद बाबी समोर आल्याने रुग्णालयातून पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत पती पांडुरंगने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे तारळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिक तपास करत असून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.