अलमट्टीची उंची वाढवू नका मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
schedule01 Aug 25 person by visibility 12 categoryकोल्हापूर

कर्नाटकने जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय लशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक पत्र लिहून ही विनंती केली. या धरणाच्या बॅक वॉटर आणि पूरस्थितीवर अभ्यास सुरू असून त्याचा अहवाल येईपर्यंत उंची वाढवण्याच्या निर्णय अविवेकी ठरेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी यांच्याकडून अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर आणि कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे. त्यामुळे या संस्थेच्या अहवालाची वाट पाहावी असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे.
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519.6 मी. वरून 524.256 मी. करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या धरणाची उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराची स्थिती गंभीर होऊ शकते. पिके, मालमत्ता, जीवन आणि उपजीविकेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कृष्णा खोऱ्यातील परिसरावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक सरकारने पुनर्विचार करावा आणि अलमट्टी उंची वाढविण्याचा निर्णय थांबवावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात बॅक वॉटरमुळे वाढणारा पूरधोका, नदीपात्रातील गाळ साचणे, वाहतूक क्षमतेवर होणारा परिणाम आणि बंधाऱ्यांमध्ये साचणारा गाळ यासह पूरस्थितीची गंभीरता स्पष्ट केली आहे.